बंदीशाळा

देशप्रेमाने आंधळे झालेल्यांच्या आणि सत्तेच्या धुंदीत असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पावलांनी जगाला उत्कर्षाच्या दिशेनं घेऊन जाणं केवळ अशक्यच. त्या अविवेकी अंधकारात प्रकाशाची आशा करणंही मुर्खपणाच ठरेल. जगातली आजची दृश्यं येऊ घातलेल्या अस्थिरतेची पूर्वसूचनाच आहे. वर्तमान घडामोडींवरील हे भाष्य अभूतपूर्व नाहीये. आजूबाजूचे बदल आपण प्रतिक्षण पाहतोच आहोत. पण या बंदीशाळा बनू पाहत असलेल्या जगात स्वतंत्र विचारांची निर्भय मनं असल्याचं पाहून उमेद येते. असो. नानाविध प्रश्नांनी वेढलेलं हे जग आज उत्तरं शोधण्यास मात्र असमर्थ ठरत आहे, त्यामुळे प्रदूषण, दहशतवाद, प्रांतवाद, युद्ध याहीपेक्षा मोठी काहीशी विकृत आणि कदाचित या सर्व समस्यांची जननी म्हणजे जगाचे तथाकथित 'असामान्य' चालक आणि त्यांची संकुचित वैचारिकता. ही संकुचितता सामान्यांना गुदमरायला लावते आणि घुसमट असह्य झाली की विवेक बळी पडतो आणि उरतं एक गुलाम मन. खरंतर जनतेचं सामान्य असणं हेच त्या अतिमहत्वाकांक्षी सत्ताधाऱ्यांच्या 'असामान्य' बनण्याचं भांडवल आहे. त्यांच्या त्या तोकड्या दृष्टीकोनातून पाहिलं तर सामान्य असणं म्हणजे माणूस नसणंच आहे. याच भावनेतून भांडवलशाही राष्ट्रांनी आफ्रिकी आणि आशियायी राष्ट्रांना बाजारपेठा अस लेबलच लावलं होतं. वर्षानुवर्षे इथल्या माणसांच स्वतंत्र अस्तित्व आधुनिकीकरणाच्या सोनेरी साखळदंडांनी जखडलं गेलं. मग पुन्हा निद्रिस्त मनांना भानावर आणण्यासाठी जिवंत मनंच कामी आली मग चळवळी झाल्या लढे झाले. आर्थिक आणि सामाजिक धक्क्यांनी बधिर झालेल्या त्या उन्मत्त शासकांनी जगाला मोकळा श्वास घेण्याची मोकळीक दिली आणि स्वातंत्रसंग्रामचे लढे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहले गेलं. खरंतर इतिहासाच्या पटलावरची तीच अक्षरं इथल्या समाजाच्या गुलामीची आणि मुक्तीसाठीच्या त्यागाची साक्षीदार आहेत. पण कदाचित सत्तर वर्षानंतर त्या स्मृती आता धूसर होऊन गेल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळ अनेक चढ उतारांनी भरलेला होता. पण जगातील सर्वात मोठी लोकशाही टिकून राहिली. काळ बदलला, सत्तांतरे घडून आली पण राज्यकर्त्यांच्या मानसिकतेचं काय? अस वाटतं की जणू सत्ता होच एक गोष्ट आहे जिच्याप्रति तो 'निष्ठा' ठेवतो आणि त्याची सगळी वैचारिकता त्याच्या खुर्चीशी बांधली गेलीये. जगाच्या बंदिशाळेतले हे 'असामान्य' कैदी. हेच कैदी आम्हाला मुक्तीची स्वप्ने दाखवतात आणि आम्ही त्यामध्ये रमून स्वतःच्या स्वप्नांना नकळतपणे मूल्यहीन बनवतो. एक गोष्ट आम्हला लक्षात घ्यायला हवी की सरकार चालवणाऱ्या मुठभर लोकांनी राष्ट्र बनत नाही. राष्ट्र हे तिथल्या माणसांच्या स्वतंत्र वैचारिकतेची अभिव्यक्ती असते. पण जगातल्या शक्तिशाली राष्ट्रांनी जणू या वैचारिक स्वातंत्र्यवर निर्बन्ध आणण्याची घृणास्पद नीती अवलंबली आहे. निखळ आणि समृद्ध लोकशाहीचा पुरस्कार करून सत्तेवर आल्यानंतर पदसिद्ध व्यक्तीने असहिष्णू लोकशाहीला व्यवस्थेत स्थान देणे हे जगातील वाढत्या अस्थैर्याचे लक्षण म्हणावं लागेल. इराक, इराण, सीरिया, अफगाणिस्तान, काश्मीर यासारख्या कित्येक प्रांतांमध्ये अविवेकीपणा थैमान घालतोय. निष्पाप जनता स्थलांतरित होतीये, पुनर्वसनाचे प्रश्न गंभीर होत आहेत. त्यातच भर म्हणून की काय हंगेरी, टर्की सारख्या देशांची विचारधारही हुकूमशाहीच्या प्रवाहात सामील होऊ पाहते. Amnesty International च्या अहवालानुसार हे जग तितकं सुरक्षित राहिलं नाही जितकं आपण समजतो. यातली तथ्यता आपण रोजच अनुभवतो आहोत. स्वातंत्र्यांच्या सत्तर वर्षानंतरही इथं धार्मिक दंगली, शेजाऱ्यांची घुसखोरी, प्रांतवाद आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांचं अस्तित्व अधिक गडद बनलं आहे. आपण मात्र एखाद्या 'जबाबदार' नागरिकाप्रमाणे गोरक्षण, आरक्षण, स्मारकं यासारख्या अनेक मुद्द्यांवर संवेदनशीलपणे विचार करू लागलो आहोत जणू जगात विचारकरण्यायोग्य समस्याच नाही. खरतर जागेपणानं सत्याची भीषणता स्विकारण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माणच झालं नाहीये. त्यामुळे आपत्तीग्रस्तांची वेदना पाहणच आम्ही टाळतो आणि आंधळेपणाने अनुत्तरित प्रश्नांचे भारवाहक बनण्यातच धन्यता मानतो. पुन्हा आम्ही त्याच विवेकहीन वैचारिकतेला आपलंसं करण्यात आणि अप्रत्यक्षपणे गुलामांची नवीन पिढी तयार करण्यात गुंतलो आहोत.
या बदलत्या जगाचा एक भाग म्हणून स्वतःची भूमिका निश्चित करणं गरजेचं आहे. व्यक्तिनिष्ठ बनलेले विचार झुगारून देऊन स्वतःची वेगळी वैचारिकता घडवायला हवी जी वर्तमानाकडे विवेकीपणाने आणि भविष्याकडे द्रष्टेपणाने पाहू शकेल. खऱ्या स्वातंत्र्याला बंदीस्त करू शकणारी बंदीशाळा जगात अस्तित्वात नाही.   
                                                       Ashish 

Comments

  1. Good article. It could have been written in little bit more simplified version. Otherwise it's good. Keep going on...

    ReplyDelete
  2. Really nice one I am proud of you

    ReplyDelete

Post a Comment